पाम बॉबच्या प्रतीक्षेत:भाग पहिला
Updated: Feb 11
पाम बॉब किंवा (शास्त्रीय नाव: सुआस्ट्स ग्रॅमिअस/Suastus gremius) हे मुंबईतल्या उद्यानांमध्ये सहज दिसणारं स्किपर प्रकारातलं फुलपाखरू. नावाप्रमाणेच ह्या फुलपाखराला पाम किंवा ताड-माड कुटुंबातल्या झाडांभोवती रुंजी घालणे पसंत असते. यावरूनच ह्याला मराठीत ताड-पिंगा असे पर्यायी नाव आहे. हे फुलपाखरू लहान आणि त्रिकोणी आकाराचं असून त्याच्या पंखांवर पतंगांसारखी (Moths) लव असते. त्याची तपकिरी-करड्या रंगाची बनावट फारशी आकर्षक नसल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष होण्याचीच शक्यता असते, पण खरी गंमत इथेच आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात एखादं पाम बॉब उडताना दिसलं, तर नक्की त्याचा पाठलाग करा आणि ते एखाद्या फुलझाडावर बसण्याची वाट बघा. ते जेव्हा ऊन खात शांत बसलेलं असतं, तेव्हा ते हळूहळू आपले पंख उघडतं आणि त्यामधली सोनेरी-पांढऱ्या ठिपक्यांची नक्षी नक्की तुम्हाला भुरळ पाडेल.

पाम बॉबची आणि माझी पहिली भेट झाली ती सप्टेंबर २०१९ मध्ये, मी नुकतीच ह्या छंदाला सुरुवात केली होती आणि तेव्हा अगदी हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतकी फुलपाखरं ओळखता येत होती. त्यानंतर ते नेहमी बागेत दिसत राहिलं विशेषतः नोव्हेंबर ते मार्च ह्या कालावधीत. पण त्याचे चांगले फोटो घेण्याआधीच ते भुर्रकन उडून जाई. कालांतराने ही फुलपाखरे आमच्या बागेत स्थिरावली, आता तर दर रोज सकाळी गुडमॉर्निंग करणाऱ्या शेजाऱ्यांसारखी ती तगरीच्या झाडावर ऊन खाताना दिसतात. त्यांची अंडी सापडेपर्यंत मात्र २०२० चा डिसेंबर उजाडला, काही वेळा अंडी दिसत पण त्यातून काही बाहेर पडत नसे.
ह्या दिरंगाईचं मुख्य कारण म्हणजे नारळाच्या किंवा अरेका पामच्या झाडावर पामफ्लाय, पामबॉब आणि जायंट रेड आय अशी तीन जातीची फुलपाखरे अंडी घालतात. सुरुवातीला मला नक्की कुठली अंडी कुणाची हे फोटो बघूनही नीट कळत नसे. शहरातील बागांमधील फुलपाखरांच्या जीवनावस्था व त्यांचे रंग काहीवेळा त्यांच्या प्राकृतिक अधिवासापेक्षा फिकट किंवा निराळे दिसतात. सामन्यतः पाम बॉबची अंडी लाल-गुलबक्षी रंगाची असतात, पण काहीवेळा फिकट पांढरी पडलेली किंवा गांधीलमाश्यांनी संक्रमित केल्याने काळवंडलेली दिसत. त्यामुळे कुठली अंडी निरोगी आणि कुठली निकामी ते कळत नसे. मग एकदा एक अंड घरी आणलं, आणि सूक्ष्मदर्शकाखाली ठेवून त्याचं निरीक्षण केलं, तेव्हा त्यावरील रेघांचा आणि रंगांचा नक्के उलगडा झाला. निसर्गतः अंडी फुटून अळी बाहेर पडते तेव्हा ती अंड्याच्या कवचाला आतून खात छिद्र पाडते आणि डोकं बाहेर काढते. अंड्याचं कवच आणि त्यातले पोषक घटक हेच अळीचं पहिलं खाद्य असतं. अशा अंड्याना मधून मोठं भोक पडून त्याचा वरचा भाग खालेल्ला दिसतो. याउलट माश्यांनी संक्रमित केलेल्या अंड्याना इंजेक्शनच्या सुईने केल्यासारखी २-३ छिद्र दिसतात आणि अंडी काळवंडलेली दिसतात. हे कोडं सुटल्यावर मग पुन्हा नवीन अंड्यांचा आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्यांचा शोध सुरु केला.

क्रमशः
Commentaires