जायंट रेड आय च्या शोधात
Updated: Feb 11
जायंट रेड आय ह्या स्किपर जातीच्या फुलपाखराशी पहिली भेट झाली ती iNaturalist मध्ये एका निरीक्षणाची ओळख पडताळताना. त्याचा माझा परिचयही नव्हता आणि कधी गाठही पडली नव्हती. आमच्या बागेत प्रामुख्याने स्मॉल ब्रँडेड स्विफ्ट (Pelopidas mathias), कॉमन ऑल (Hasora badra) आणि पाम बॉब (Suastus gremius) ही Hesperiidae गटातील फुलपाखरे सहज आढळतात. रंगाने तपकिरी आणि भर्रकन उडणारी फुलपाखरे ओळखणे हे खरं तज्ञांचच काम, त्यामुळे माझ्यासारख्या नवशिक्याला अनेकदा फोटो पाहूनही त्यात गोंधळ होतो. जायंट रेड आय मात्र, पर्यायाने ओळखायला सोपं..त्याचं मोठं डोकं, लालसर टपोरे डोळे आणि लांबलचक सोंड दुरूनही सहज ओळखता येते. जायंट रेड आयचं शास्त्रीय नाव गंगारा थायरिस (Gangara thyrsis), मराठीत ह्याच्या डोळ्यांमुळे त्याला "विशाल रक्तलोचन" असं समर्पक पर्यायी नाव आहे. जर सूर्यप्रकाशात कॅमेराच्या फ्लॅश शिवाय जर फोटो काढलातर त्याचे डोळे साधारणच दिसतात, मात्र फ्लॅश वापरला तर "रेड आय इफेक्ट" मुळे त्याचं नाव सार्थ होतं.

भारतीय द्वीपकल्पातलं हे एक सर्वात मोठ्या प्रकारचं Hesperiidae फुलपाखरू मुंबईत दिसायला जरा कठीण. त्याचं कारण असं की बहुतेक फुलपाखरं, सूर्य आकाशात उंचावर आला की कार्यरत होतात. शहरात साधारण दहापासून अगदी दुपारी चार वाजेपर्यंत फुलपाखरे उडताना दिसतात, मात्र जायंट रेड आय फुलपाखरं थोडीशी बुजरी असल्याने फक्त सकाळच्या कोवळ्या उन्हात किंवा संधीप्रकाशात भिरभिरताना दिसतात. आयक्सॉरा, तगर आणि कुंदाची फुले ही यांचे आवडती मधुप्राशनाची फुलझाडं (Nectar plants). अशाच एका रविवारच्या सकाळी आमच्या बागेतल्या गुलाबी आयक्सॉराच्या फुलांवर मला हे फुलपाखरू दिसलं, आणि त्यानंतर आठवडाभर भेटत राहिलं. कधी फुलांवर उडताना, तर कधी करकोचाच्या चोचीसारखी आपली सोंड फुलांत तळापर्यंत खुपसून मध पिताना त रकधी कोळ्याच्या जाळयात अडकून पडलेलं अशा विविध स्वरूपात ते सतत डोळ्यासमोर राहिलं. एकेदिवशी तर एक सोडून दोन दिसली आणि माझ्या मनांत विचार चमकून गेला कदाचित हा ह्यांचा मीलनाचा काळ असावा आणि त्यामुळे ती इतक्या सहजदर्शनी पडत असावीत. प्रणयकाळात नर आणि मादी फुलपाखरे जोडीदाराच्या शोधार्थ सतत उडत राहतात. पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोराप्रमाणे आपल्या पंखांची शोभा प्रदर्शित करत, एकमेकांच्या दृष्टीस पडणे हे त्यांच्या अल्पशा जीवनकाळातील महत्वाची पायरी असते. जायंट रेड आयच्या नर आणि मादीत विशेष फरक आढळत नाहीत, त्यामुळे त्यांची पुढील निरीक्षणे कशी करायची असा प्रश्न माझ्यापुढे पडला आणि मग विचार आला तो त्यांच्या अंड्यांचा.
फुलपाखरे आपली अंडी नेहमी विशिष्ट प्रजातीच्या झाडांवरच घालतात, ज्यांना त्यांच्या भक्ष्य वनस्पती (Larval feeding plant) असे संबोधले जाते. जायंट रेड आयसाठी ही झाडे ताड-माड कुळातीलअसतात उदा. नारळ, वेत, सुपारी. कोकणात ही झाडे मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांचे तिथे सहज वास्तव्यअसते, पण मुंबईत सुपारीची झाडे कुठून सापडणार? तसं समुद्रकिनारी असल्याने मुंबईत नारळाची झाडे आढळतात पण ती असतात इमारतीएवढी उंच, तेव्हा करायचं काय हा मोठा प्रश् नहोता. सुपारीची किंवा वेताची झाडं आसपास कुठेचनव्हती, नारळाची होती पण ती इतकी उंच की त्यावरची अंडी शोधणं निव्वळ अशक्य. तेव्हा मला जाणवलं की फुलपाखरं बहुदा जमिनीलगतच उडतात त्यामुळे ती उंचावर अंडी घालत असण्याची शक्यता कमी होती. तेव्हा मी कमी उंचीची (३-४ फूट) नारळाची (शास्त्रीय नाव: Cocos nucifera) झाडं शोधण्यास सुरुवात केली. पण त्यांवर कुठेच नुकतीच घातलेली अंडी दिसेनात. तेव्हा मला आणखी एक क्लृप्ती सुचली, आकाराने तंतोतंत नारळासारखीच दिसणारी 'अरेका पाम' (शास्त्रीय नाव: Dypsis lutescens), या शोभिवंत जातीची झाडे मुंबईतील बागांमध्ये सर्वत्र लागवड केलेली आढळतात. ह्या झाडांवर पूर्वी मला 'पामफ्लाय' आणि 'पाम बॉब' ह्या या दोन्ही नारळावरचअंडी घालणाऱ्या फुलपाखरांची अंडी सापडली होती. ifoundbutterflies च्या वेबसाईटवरही ह्या झाडांचा (larval feeding plant) म्हणून संदर्भ मिळाला आणि मग शोध सुरु झाला खऱ्या अर्थाने.
रोज सकाळी उठायचं, बागेत जायचं आणि एकेक झाड तपासून बघायचं. फुलपाखरं झाडांच्या कोवळ्या पानांवर अंडी घालतात, तेव्हाशक्यतो शेंड्याकडची नवीन फुटलेली पान तपासायचं ठरवलं. आमच्या बागेत ह्या प्रजातीची किमान पंचवीस-तीस तरी झाडंअसतील आणि तीही सहा एकरात विखुरलेली, मग ती फुलपाखरं पहिल्यांदा दिसली त्या जागेपासून सुरुवात केली पण दिवसभरात काहीच हाती लागलं नाही. बरं ही फुलपाखरंअंडी घालतात ती खूपदा एका पानावर एकच आणि आकाराने साबुदाण्याएवढी, मग ती शोधणार कशी, पण तरीही शोध नेटाने चालू ठेवला. मी नेहमी मोबाईलने फोटो काढताना GPS लोकेशनऑन ठेवूनच फोटो काढतो, ज्यामुळे पिकासा किंवा गुगल फोटो मध्ये Geotag किंवा स्थाननिश्चितीं करणे शक्य होते. ह्या माहितीचा वापर करून मी याआधी आठवडाभरात काढलेल्या फोटोंच्या स्थानांचा एक नकाशा (geo-cluster map) बनवला. त्यावरून असं ध्यानात आलं की ही फुलपाखरे प्रामुख्याने ५० फूट भू भागातफुलांवर फिरतात, तेव्हा त्याच्या आसपासच्या झाडांचा कसून शोध घ्यायचं ठरवलं आणि मग त्याला यश मिळालं. एका अरेका पामवर दिसलं एक पांढुरकं अंड, मग दुसऱ्या, तिसऱ्या असं करत करत बरीच झाडं मिळाली. त्यातली काही परजीवी गांधील माशांनी भक्ष्य बनवलेली आढळली. ह्या माश्या अंडी, अळी किंवा कोषावस्थेत असलेल्या फुलपाखरांच्या अवस्थांमध्ये त्यांत अंडी घालून आपली प्रजा वाढवतात, त्यामुळे शिशुंवस्थेतल्या माश्यांना आयताच अन्नपुरवठा होतो. जवळपास निम्मी अंडी उबण्याआधीच माश्यांच्या भक्षस्थानी पडतात, पण ही सुद्धा फुलपाखरांची संख्यावाढ नियंत्रित करण्याची निसर्गयोजनाच आहे.
माझा हा उपक्रम चालूझाल्याला पूर्ण एक महिना उलटून गेला होता, पण मी चिकाटीने नवीन अंड्यांचा शोध आणि झाडांची तपासणी चालूच ठेवली. त्यातूनच एक झाडावर मग कोषावस्थेला पोचलेली एक मोठी अळी मिळाली. जन्मतः काही मिलीमीटर आकाराच्या या अळ्या पिवळसर हिरव्या रंगाच्या असतात आणि त्यांचे डोके तपकिरी रंगाचे असते. काही दिवसांतच या अळ्या स्वतःभोवतीच्या पानांवर समोरासमोरच्या कडांवर टाके घालून ते आपल्याभोवती पांघरुणासारखं लपेटून घ्यायला सुरवात करतात. ही गोष्ट लक्षात येताच पुढेपुढे पानाला विशिष्ट कोनात दुमड दिसली की त्यात अळी असणार हे दुरूनच ओळखता येऊ लागलं. एक दोनदा नाईलाजाने आत डोकावून बघण्यासाठीही शिवण उसवावी लागलीपण त्याने अळ्यांना विशेष काही अपाय न होता त्यांनी दुसऱ्या दिवशी ही वीण पुन्हा जोडलेली दिसली. कडक उन्ह आणि शिकाऱ्यांपासून वाचण्याची ही त्यांची नामी युक्ती असावी जणू. असेच काहीदिवस गेल्यानंतर अळ्या आपल्या शरीरातून पांढरी पूड सोडताना दिसू लागल्या, ही वेळ असते त्यांच्या रूपांतरणाची. सुरुवातीला गुळगुळीत अंगाच्या असणाऱ्या अळ्या हळूहळू एखाद्या पिठाच्या गिरणीत काम करणाऱ्या चक्कीवाल्यासारख्या पांढऱ्या रूपांतरास सुरुवात दिसू लागतात. त्यांचं अंगही सतरंजीच्या कडेला असणाऱ्या धाग्यांसारखं जाड होतं आणि मग त्यांचं हळहळू कोशात रूपांतर होत जातं. अशावेळी जर अळी असलेल्या पानाला धक्का लागलाच तर अळी एखाद्या खुळखुळ्या सापासारखी (Rattlesnake) कटकट आवाज करत, जोरात थड्थडू लागते. त्यामुळे त्यांचे शत्रू तिथून काढता पाय घेतात. कालांतराने कोष पूर्ण होताच पुन्हा अळीची त्वचा गुळगुळीत होऊन वयस्क फुलपाखराकडे वाटचाल होऊ लागते. कोष सुरुवातीला फिकट पिवळसर असून जसजशी वाढ पूर्ण होतेतसा गडद तपकिरी होऊलागतो. फुलपाखरू बाहेर पडण्याच्या एक दिवस आधी कोष काळसर आणि अर्धपारदर्शक होऊनआतील वाढ पूर्ण झालेल्या फुलपाखराचे पंख आणि डोळे स्पष्ट दिसतात. आणि मग पुढील दिवशी फुलपाखरू बाहेर पडतं. अंड्यापासून फुलपाखरापर्यंत संपूर्ण जीवनचक्रास साधारणतः तीस ते पस्तीसदिवस लागतात.
अशाप्रकारे १८ जानेवारी २०२१ला सुरु झालेला हाउपक्रम, १५ फेब्रुवारीला एकाफुलपाखराच्या कोषातून बाहेर पडण्याने त्याची एक मालिका पूर्ण झाली आणि मार्चपर्यंत त्याची ३१ वेगवेगळी निरीक्षणं झाली. अजूनही बऱ्याच रिकाम्या जागा भरायच्या आहेत, जमा झालेल्या माहितीचं संकलनही बाकी आहे. ह्याफुलपाखरांबरोबर त्यांच्याशी निगडीत असणाऱ्या परजीवी माश्यांचाही स्वतंत्ररित्या अभ्यास चालू आहेच. बघूयाहा प्रवास कुठपर्यंत जातोय ते!!
धन्यवाद!!
- गौरव स. सोमण.
ह्या लेखनाकरिता वापरलेले काही प्रमुख संदर्भ/संकेतस्थळे
4. Notes on Biology and Life Cycle of Giant Redeye (Gangara Thyrsis) Butterfly by Indrakanti Sai Mounika and Dr Antoney P., IJISRT; Volume 4, Issue 2, February –2019
Comments