top of page
Search

जायंट रेड आय च्या शोधात: भाग पहिला

Writer's picture: Gyro InfographicGyro Infographic

Updated: Feb 11

जायंट रेड आय ह्या स्किपर जातीच्या फुलपाखराशी पहिली भेट झाली ती iNaturalist च्या फोरम मध्ये एका निरीक्षणाची ओळख पडताळताना. त्याचा माझा परिचयही नव्हता आणि कधी गाठही पडली नव्हती. आमच्या बागेत प्रामुख्याने स्मॉल ब्रँडेड स्विफ्ट (Pelopidas mathias), कॉमन ऑल (Hasora badra) आणि पाम बॉब (Suastus gremius) ही Hesperiidae गटातील फुलपाखरे सहज आढळतात. रंगाने तपकिरी आणि भर्रकन उडणारी फुलपाखरे ओळखणे हे खरं तज्ञांचच काम, त्यामुळे माझ्यासारख्या नवशिक्याला अनेकदा फोटो पाहूनही त्यात गोंधळ होतो. जायंट रेड आय मात्र, पर्यायाने ओळखायला सोपं..त्याचं मोठं डोकं, लालसर टपोरे डोळे आणि लांबलचक सोंड दुरूनही सहज ओळखता येते. जायंट रेड आयचं शास्त्रीय नाव गंगारा थायरिस (Gangara thyrsis), मराठीत ह्याच्या डोळ्यांमुळे त्याला "विशाल रक्तलोचन" असं समर्पक पर्यायी नाव आहे. जर सूर्यप्रकाशात कॅमेराच्या फ्लॅश शिवाय जर फोटो काढला तर त्याचे डोळे साधारणच दिसतात मात्र फ्लॅश वापरला तर सुंदर "रेड आय इफेक्ट" मुळे त्याचं नाव सार्थ होतं.

गुलाबी आयक्सॉराच्या फुलावर बसलेलं जायंट रेड आय फुलपाखरू
गुलाबी आयक्सॉराच्या फुलावर बसलेलं जायंट रेड आय फुलपाखरू

फुलपाखरे आपली अंडी नेहमी विशिष्ट प्रजातीच्या झाडांवरच घालतात, ज्यांना त्यांच्या भक्ष्य वनस्पती (Larval feeding plant) असे संबोधले जाते. जायंट रेड आयसाठी ही झाडे ताड-माड कुळातील असतात उदा. नारळ, वेत, सुपारी. कोकणात ही झाडे मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांचे तिथे सहज वास्तव्यअसते, पण मुंबईत सुपारीची झाडे कुठून सापडणार? तसं समुद्रकिनारी असल्याने मुंबईत नारळाची झाडे आढळतात पण ती असतात इमारतीएवढी उंच, तेव्हा करायचं काय हा मोठा प्रश्न होता. त्यांचं उत्तरही ही निसर्गानेच दिलं, कसं ते आपण पुढच्या भागात पाहू…

(क्रमशः)

 
 
 

Opmerkingen


bottom of page