जायंट रेड आय च्या शोधात: तिसरा व अंतिम भाग
आतापर्यंत माझा हा उपक्रम चालू झाल्याला पूर्ण एक महिना उलटून गेला होता, पण मी चिकाटीने नवीन अंड्यांचा शोध आणि झाडांची तपासणी चालूच ठेवली. त्यातूनच एक झाडावर मग कोषावस्थेला पोचलेली एक मोठी अळी मिळाली. जन्मतः काही मिलीमीटर आकाराच्या या अळ्या पिवळसर हिरव्या रंगाच्या असतात आणि त्यांचे डोके तपकिरी रंगाचे असते. काही दिवसांतच या अळ्या स्वतःभोवतीच्या पानांवर समोरासमोरच्या कडांवर टाके घालून ते पण आपल्याभोवती पांघरुणासारखं लपेटून घ्यायला सुरवात करतात.

ही गोष्ट लक्षात येताच पुढेपुढे पानाला विशिष्ट कोनात दुमड दिसली की त्यात अळी असणार हे दुरूनच ओळखता येऊ लागलं. एकदोनदा नाईलाजाने आत डोकावून बघण्यासाठी ही शिवण उसवावी लागली पण त्याने अळ्यांना विशेष काही अपाय न होता त्यांनी दुसऱ्या दिवशी ही वीण पुन्हा जोडलेली दिसली. कडक उन्ह आणि शिकाऱ्यांपासून वाचण्याची ही त्यांची नामी युक्ती असावी जणू. असेच काही दिवस गेल्यानंतर अळ्या आपल्या शरीरातून पांढरी पूड सोडताना दिसू लागल्या, ही वेळ असते त्यांच्या रूपांतरणाची. सुरुवातीला गुळगुळीत अंगाच्या असणाऱ्या अळ्या हळूहळू एखाद्या पिठाच्या गिरणीत काम करणाऱ्या चक्कीवाल्यासारख्या पांढऱ्या रूपांतरास सुरुवात दिसू लागतात. त्यांचं अंगही सतरंजीच्या कडेला असणाऱ्या धाग्यांसारखं जाड होतं आणि मग त्यांचं हळहळू कोशात रूपांतर होत जातं.

अशा वेळी जर अळी असलेल्या पानाला धक्का लागलाच तर अळी एखाद्या खुळखुळ्या सापासारखी (Rattlesnake) कटकट आवाज करत, जोरात थड्थडू लागते. त्यामुळे त्यांचे शत्रू तिथून काढता पाय घेतात. कालांतराने कोष पूर्ण होताच पुन्हा अळीची त्वचा गुळगुळीत होऊन वयस्क फुलपाखराकडे वाटचाल होऊ लागते. कोष सुरुवातीला फिकट पिवळसर असून जसजशी वाढ पूर्ण होते तसा गडद तपकिरी होऊ लागतो. फुलपाखरू बाहेर पडण्याच्या एक दिवस आधी कोष काळसर आणि अर्धपारदर्शक होऊन आतील वाढ पूर्ण झालेल्या फुलपाखराचे पंख आणि डोळे स्पष्ट दिसतात.

मग पुढील दिवशी फुलपाखरू बाहेर पडतं. अंड्यापासून फुलपाखरापर्यंत संपूर्ण जीवनचक्रास साधारणतः तीस ते पस्तीस दिवस लागतात.

अशाप्रकारे १८ जानेवारीला सुरु झालेला हा उपक्रम, १५ फेब्रुवारीला एका फुलपाखराच्या कोषातून बाहेर पडण्याने त्याची एक मालिका पूर्ण झाली आणि मार्चपर्यंत त्याची ३१ वेगवेगळी निरीक्षणं झाली. अजूनही बऱ्याच रिकाम्या जागा भरायच्या आहेत, जमा झालेल्या माहितीचं संकलनही बाकी आहे. ह्या फुलपाखरांबरोबर त्यांच्याशी निगडीत असणाऱ्या परजीवी माश्यांचाही स्वतंत्ररित्या अभ्यास चालू आहेच. बस, लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा आहे. तेव्हा सध्या सर्व नियम पाळून घरूनच लिखाण करत तुमच्या सूचना-प्रतिक्रियांची वाट बघतोय.
धन्यवाद!!
- गौरव स. सोमण
ह्या लेखनाकरिता वापरलेले काही प्रमुख संदर्भ/संकेतस्थळे
https://www.thehindu.com/features/metroplus/Crawling-threads/article14010109.ece
Notes on Biology and Life Cycle of Giant Redeye (Gangara Thyrsis) Butterfly by Indrakanti Sai Mounika and Dr Antoney P., IJISRT; Volume 4, Issue 2, February –2019
https://pareshkale.blogspot.com/2013/11/giant-redeye-gangara-thyrsis.html
Commentaires